शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे :
गोंडऊमरी गावासह परिसरात गुरुवारी (दि. 13) होळी सण पारंपरिकरित्या साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. 14) धुलिवंदन असून सणाच्या पूर्वसंध्येला गोवऱ्या जमा करण्याची, टिमक्या वाजविण्याची लगबग सुरु झाली आहे. रंगोत्सवानिमित्त बाजारपेठेत विविध साहित्य दाखल झाले आहे. ग्रामीण भागातील आठवडी बाजार, किराणा दुकान आणि जनरल स्टोअर्स मध्ये पिचकारी, मुखवटे व विविध रंगांनी स्टॉल सजले असून ग्रामीण भागातील ग्राहकांनी खरेदीला सुरुवात केली आहे .
फाल्गुन पौर्णिमेच्या मुहूर्तावर होळी सण साजरा करण्यात येतो. यानंतर दुसऱ्या दिवशी साजरी होणाऱ्या धुळवडीची उत्सुकता असते. धूलिवंदन हा आबालवृध्दांचा उत्साह वाढविणारा सण आहे. गावात – गावात गल्लोगल्लीत होळी होळी पेटविली जाते. गोवऱ्या व लाकडे रचून होलिकायै नम हा मंत्र म्हटला जातो. प्रत्येक घरातून आणलेला नैवेद्य देवाला अर्पण केला जातो. अनिष्ट प्रवृतीची होळी करून आयुष्यातील आनंदाचा रंगोत्सव साजरा करायचा, हा होळी सणामागचा हेतू असतो. होळी सणाच्या पूर्वसंध्येला गल्लीत मंडप घालणे,लाकूड आणणे अशा कामांचे नियोजन पूर्ण झाले आहे. होळीचे वेध लागले असून लहान मुले टिमक्या वाजवण्याचा आनंद लुटत आहेत. रंगांच्या किमती गतवर्षीच्या तुलनेत स्थिर असून ओल्या रंगापेक्षा कोरड्या रंगंचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. विविध प्रकारच्या पिचकाऱ्या, रंग खेळण्याचे फुगे, मुखवटे यांनी दुकाने सजली आहेत.
सध्या रंगापेक्षा रंग उडविण्याच्या साहित्याला मागणी आहे. पिचकाऱ्या व टिमक्यांच्या
खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. होळीआधी दोन दिवस उलाढाल वाढण्याची शक्यता आहे. विविध साहित्य दरात किंचित वाढ झाली तरी गतवर्षीप्रमाणेच दर स्थिर आहेत.
— राजेंद्र ब्राम्हणकर, विक्रेते, रेल्वेटोली, गोंडऊमरी..
Discussion about this post