प्रतिनिधि किरण पाठक अमळनेर..
अमळनेर :
शहरातील गांधीनगर भागातील ५१ अतिक्रमणावर तीन जेसीबी चालले अन अनेकांच्या चुली मोडल्या…संसार उघड्यावर पडले…रोजा असताना भर उन्हात लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत घरातल्या वस्तू वाचवण्यासाठी धडपडत होते…काही तासात सर्व संपले होते….भुकेल्या पोटाला प्रश्न होता पुढे काय…. अन इस्लामपूरा मदतीला धावला_
गांधीनगर भागात मजूर व हातगाड्यांवर विक्री करणाऱ्यांची घरे होती. पालिकेने आधी नोटिसा दिलेल्या असल्या तरी एक राजकीय नेत्याने काहीच होणार नाही असे आश्वासन दिले तर ऍड सलीम खान यांनी ९ रोजी रविवारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि पालिकेचे विधी सल्लागार किरण पाटील यांना शनिवार रविवार सुटी असल्याने मी १० रोजी पालिकेच्या नोटीसीला मनाई हुकुम साठी दावा करणार असल्याची नोटीस दिली होती. पालिका सावध झाली अन ऍड सलीम खान यांच्या नोटीसीकडे दुर्लक्ष केले अन न्यायालयात जाण्यापूर्वीच अतिक्रमण निघाले. गरिबांचे संसार कोलमडले. सामान काढायला तेव्हढी फुरसत मिळाली पण घराचे छत पत्रे जेसीबीच्या पंजाखाली चिरडले जात होते अन त्या मजुरांच्या काळजाचे तुकडे होत होते. कुणी शिव्यांची लाखोली वाहत होते … कुणी गयावया करीत होते तर कुणी रडत होते. या वस्तीत हिंदू मुस्लिम कुटुंब एकत्र नांदत असल्याने काही कुटुंबांचा रोजा सुरू होता तरी उन्हात वस्तू आवरण्यासाठी तळमळ सुरू होती. काहींना म्हाडावर जायचे नव्हते , काही नातेवाईकांकडे आसरा मागत होते ,काही गाड्यांमध्ये सामान भरत होते. काही मात्र त्याच ठिकाणी उघड्यावर आपले सामान सांभाळत खिन्न मनाने उपाशी बसले होते. इस्लामपुरा हा मुस्लिम वस्तीचा भाग आहे. रोजा उपवास सोडल्यानन्तर सारे एकत्र जमले मुस्लिम बांधवांना रोजा सोडण्यासाठी ‛इफ्तार’ साठी आणि हिंदू बांधवांची भूक शमवण्यासाठी त्यांना अन्नाची पाकीट वाटण्यात आले. मुस्लिम बांधवांना पहाटेचे ‛सहेरी’ साठी देखील व्यवस्था केली. ना जात न धर्म पाहता माणुसकीच्या नात्याने इस्लामपूरा भागातील तरुणांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. दुपारी देखील एका म्हातारीला एक पोलिसाने जेवू घातल्याचा सुखद अनुभव आला. रात्रभर कुटुंब उघड्यावर उद्याची चिंता करत बसले होते. काही विखुरलेल्या विटा उचलत होते काही रात्रभर सामान वाहत होते. अजून दोन दिवस तरी या उध्वस्त कुटुंबाना आधाराची गरज आहे.
नगरपरिषदेने म्हाडा मध्ये दिलेल्या घरांना दारे खिडक्या दुरुस्त करून घ्यावेत अशी मागणी होत आहे..
Discussion about this post