शिरूर तालुका प्रतिनिधी:-
शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील सेंट चावरा स्कूलवर मराठी माध्यमाची परवानगी असतानाही परवानगीशिवाय इंग्रजी माध्यमातून शिक्षण चालवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत सदर शाळेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, शहराध्यक्ष आदित्य मैड, व शहर सचिव रवी लेंडे यांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी यासंबंधी लेखी तक्रार सादर केली होती. त्यांनी शाळेच्या परवानगीविना सुरू असलेल्या इंग्रजी माध्यमा विरोधात आवाज उठवत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेत, १२ फेब्रुवारी २०२५ रोजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शिरूर यांनी जिल्हा परिषद पुणे (प्राथमिक शिक्षणाधिकारी) यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पत्र पाठवले. त्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद पुणे यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मार्गदर्शन सूचना पाठवत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. शेवटी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शिरूर यांनी ११ मार्च २०२५ रोजी अधिकृत आदेश काढत, शाळा तात्काळ बंद करण्याचा व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, २०१६ पासून बेकायदेशीर इंग्रजी माध्यम चालवल्याबद्दल प्रति दिवस १००० रुपये प्रमाणे एकूण एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आगामी शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही शाळा चालू ठेवल्यास दररोज १०,००० रुपयांचा अतिरिक्त दंड आकारण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर शाळा चालवणाऱ्यांना चपराक बसली असून, इतर शाळां साठी ही हा इशारा ठरणार आहे, असे मत महिबूब सय्यद यांनी व्यक्त केले.
Discussion about this post