एक किलोमीटर नेले फरफटत
दिंद्रुड प्रतिनिधी
तीन मित्रांनी हॉटेलवर जेवण केले, वेटरला बिल आणण्यासाठी सांगितले दिलेले बिल फोन पे च्या स्कॅनर वर टाकतो म्हणून बील न देताच गाडीत जाऊन बसले. गाडी जवळ आलेल्या वेटरला एक किलोमीटर पर्यंत फरपटत नेऊन मारहाण करत रात्रभर ओलीस ठेवले ही घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत शनिवारी सायंकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, दिंद्रुड पोलीस हद्दीतील मेहकर- पंढरपूर या पालखी महामार्गावर असलेल्या विसावा धाबा या हॉटेल मध्ये सखाराम जनार्दन मुंडे व अन्य दोघेजण जेवणासाठी चारचाकी गाडीतून आले होते. त्यांनी तेथे येथेच्छ जेवण केले, वेटर शेख साहिल अनुसूद्दीन ला बिल घेऊन ये असं सांगितले. वेटरने बिल दिल्यानंतर ते फोन पे च्या स्कॅनर वर टाकतो म्हणून तिघेजण गाडीत जाऊन बसले.
वेटर स्कॅनर घेऊन ज्या वेळेला गाडी जवळ गेला त्यावेळेस तू आम्हाला बिल का मागतोस म्हणून वाद घालत चालका शेजारी बसलेल्या एक जणाने त्याला धरून एक किलोमीटर पर्यंत फरफटत नेऊन त्यास तिघांनी मारहाण केली. त्याच्या खिशातील 11500 रुपयांची रक्कम हिसकावून घेतली व गाडीच्या पाठीमागे टाकून डोळ्याला पांढरी पट्टी बांधत अज्ञात स्थळी नेत अपहरण केले.
शनिवारी रात्रभर अपहृत तरुण गाडीतच होता. दरम्यान रविवारी सकाळी धारूर तालुक्यातील भाईजळी शिवारात त्याला सोडून देण्यात आले. शेख साहिल अनुसूद्दीन या वेटरच्या फिर्यादीवरून सखाराम जनार्दन मुंडे (रा. भाईजळी ता.धारूर) व अन्य अनोळखी दोघांच्या विरोधात दिंद्रुड पोलिसात रविवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 अन्वये 140 (3), 119 (1),115 (2), 351 (2),351 (3),281, 125 (ए),3 नुसार दिंद्रुड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड करत आहेत.
Discussion about this post