
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लातुरात पुन्हा आमरण उपोषण..
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारे कुटुंबियांचे बोगस जातवैधता प्रमाणपत्र रद्द करावे,धनगर आरक्षणाची अनुसूचित जमाती आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी,या मागणीसाठी धनगर समाजाने लातूर मधून निर्णायक लढ्याची हाक देत दुसऱ्यांदा आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
मल्हारयोद्धे चंद्रकांत हजारे,अनिल गोयकर यानी आमरण उपोषणास सुरुवात केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारे कुटुंबियांचे बोगस जातवैधता प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावे, अन्यथा आपण आंदोलन मागे घेणार नसल्याची आक्रमक भूमिका हजारे यांनी घेतली असून, त्यांच्या या आंदोलनाला धनगर समाज बांधवांनी पाठिंबा दिला आहे.
सोमवार दि.९ सप्टेंबर पासून मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी आमरण उपोषण सुरु केले असून उपोषणाचा आज पहिला दिवस आहे. महाराष्ट्रातील धनगर समाज मागील ७० वर्षापासून घटनेत असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी करीत आहे.
यासाठी अनेक आंदोलने झाली, अनेक मोर्चे झाले आणि उपोषणे झाले;अनेक वेळा साखळी उपोषण,आमरण उपोषण,रास्तारोको,मुंडण आंदोलन,निवेदणे,सभा,रेल रोको आंदोलने झाले तरी सुद्धा सर्वच सत्ताधारी पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे.
यापूर्वी केलेल्या आमरण उपोषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या मागणीसंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे म्हटले होते परंतु सरकारकडून कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही म्हणून सोमवार दि.९ सप्टेंबर पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक समोर सकल धनगर जमातीच्या वतीने मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
Discussion about this post