पनवेल प्रतिनिधी:- पनवेल महानगरपालिके तर्फे 14 वर्षे वयोगटातील मुलींकरीता एचपीव्ही (ह्युमन पॉपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहीमेचा शुभारंभ महिला दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 8 मार्च रोजी उपमहापौर प्रमिला पाटील, अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे, महापालिका सदस्य दर्शना भोईर, अजय बहिरा ,प्रिती जाॅर्ज, प्रतिभा भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत गावदेवी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 येथे करण्यात आला.
एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा उद्देश गर्भाशयमुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करणे हा आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेच्या सर्व 15 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावरती सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पुढील 3 महिन्यांपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे.
एचपीव्ही लसीकरण 14 वर्षे वयोगटातील (ज्यांनी 14 वर्षे पूर्ण केलेली आहेत व 15 वर्षे पूर्ण केलेली नाहीत) मुलींना देण्यात येणार आहे. एकूण लोकसंख्येच्या 1 % लाभार्थी ही मोहिमेकरीता अपेक्षित लाभार्थी असतील. पनवेल महानगरपालिकेकडून ‘एचपीव्ही’ लसीकरणास सुरुवात झाली असून महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त मुलींनी लाभ घेण्याचे आवाहन मूख्य वैद्यकिय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी केले आहे.
आजच्या शुभारंभ कार्यक्रमास माता बाल संगोपन अधिकारी डॉ. गणेश नायर, वैद्यकिय अधिकारी डॉ.रेहाना मुजावर, आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा सेविका उपस्थित होते.
एचपीव्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (Human Papilloma Virus) व त्यांच्या लसीकरणाची माहिती-
- एचपीव्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (Human Papilloma Virus) या विषाणूमुळे प्रजनन मार्गातील एक सामान्य संसर्ग होतो. गर्भाशयमुखाच्या (Cervix) कर्करोगाच्या बहुतांश रुग्णांमध्ये एचपीव्ही जबाबदार असतो. एचपीव्ही संसर्गापासून संरक्षण मिळवण्यासाठी एचपीव्ही लसीकरण हा प्रभावी उपाय आहे.
2.जगभरात आतापर्यंत 50 कोटींहून (500 Million) अधिक महिलांना ही लस देण्यात आलेली आहे आणि तिच्या सुरक्षितता व परिणामकारकतेबाबत 15 वर्षाहून अधिक कालावधीतील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित माहिती उपलब्ध आहे.
3.गर्भाशयाच्यामुखाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. एचपीव्ही लसीकरण म्हणजे मुलींच्या भविष्यातील आरोग्याचे संरक्षण आहे.
4.एचपीव्ही लस प्रजनन क्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम करत नाही; उलट ती गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देते. एचपीव्ही लस सुरक्षित, प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आहे.







