जत (प्रतिनिधी 9404008603) – शहराच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जत नगर परिषदेचा कारभार फक्त कागदावरच चालतो का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील अनेक भागांत रस्त्यांची दुरवस्था, तुंबलेल्या गटारी आणि मोडकळीस आलेली सार्वजनिक शौचालये यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जत शहरातील विविध प्रभागांत रस्ते खड्ड्यांनी भरलेले असून अनेक ठिकाणी गटारी तुंबून अस्वच्छता निर्माण झाली आहे. पावसाळा जवळ आला असताना देखील गटार स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे वेळेत होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
याशिवाय शहरातील काही सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत खराब झाली असून साफसफाई व दुरुस्तीचा अभाव दिसून येत आहे. काही ठिकाणी पाणी व्यवस्था नसणे, तुटलेले दरवाजे आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांना शौचालयांचा वापर करणे कठीण झाले आहे.
नगर परिषदेकडून विकासकामांसाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले जाते, मात्र ही कामे प्रत्यक्षात कधी सुरू होणार आणि पूर्ण होणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. शहरातील विविध भागांत नागरिकांमध्ये याबाबत कुजबुज सुरू असून प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, शहरातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी रस्ते, गटारी आणि सार्वजनिक शौचालयांची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच मंजूर झालेल्या विकासकामांची पारदर्शक माहिती नगर परिषदेकडून जाहीर करावी.
दरम्यान, जत नगर परिषद प्रशासनाने नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.








