बोदवड (दि. २३ मार्च २०२६): श्री सिद्धेश्वर हनुमान मंदिर, शिरसाळा येथे घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनेमुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरातील गाभाऱ्यात हनुमंतरायांच्या मूर्तीसमोरील स्तंभावर अनेक वर्षांपासून शेंदूर लावलेला होता. या शेंदुराखाली नेमकी कोणती मूर्ती आहे, याबाबत भाविकांच्या मनात नेहमीच उत्सुकता होती.
ही उत्सुकता सर्पमित्र समाधान गोसावी यांच्या श्रमदानातून संपुष्टात आली. त्यांनी वर्षानुवर्षे साचलेला शेंदूर काढल्याने त्या ठिकाणी नंदी (महादेवाचे वाहन) यांची मूळ मूर्ती उजेडात आली आहे.
🛕 शेकडो वर्षांनंतर मूर्तीचे मूळ स्वरूप समोर
मूर्तीवर साचलेल्या शेंदुराचा थर काढण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले. सुमारे ५ ते ६ किलो शेंदूर काढण्यात आला. या कामात पुजारी प्रल्हाद नामदेव धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली राजू धनगर, रामभाऊ पाटील, रमेश बोरसे व इतर भक्तांनी सहभाग घेतला.
काढण्यात आलेल्या शेंदुराचे विसर्जन तापी-पूर्णा संगम, चांगदेव येथे करण्यात आले.
🙏 भाविकांसाठी विशेष धार्मिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव यांचा अकरावा महारुद्र अवतार म्हणजे भगवान हनुमान होय. त्यामुळे हनुमंतरायांच्या मूर्तीसमोर नंदीचे दर्शन होणे हे विशेष धार्मिक महत्त्वाचे मानले जात आहे.
📍 ऐतिहासिक संदर्भ
बोदवड तालुक्यातील कुर्हा हरदो येथील ऐतिहासिक बारव परिसरातही बजरंगबलीच्या मंदिरासमोर नंदीची मूर्ती असल्याचे उदाहरण आढळते.










