अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना शेतकरी कार्ड योजनेचा लाभ तात्काळ द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात समितीच्या वतीने बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, यावर तातडीने निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेले हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी स्वीकारले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतकरी कार्डसाठी आवश्यक असलेली सातबारा व इतर कागदपत्रे ऑनलाईन सादर करून एक ते दीड वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, यादीत नाव असूनही अद्याप त्यांच्या खात्यावर कोणतेही अनुदान जमा झालेले नाही.
तहसील कार्यालयात चौकशी केल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून ‘यादीत नाव आहे’ एवढेच उत्तर दिले जाते; मात्र लाभ का मिळत नाही, त्रुटी नेमकी काय आहे, याबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यादी आल्यानंतरच कारण स्पष्ट करता येईल, असे सांगण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
शेतकरी रेशनकार्ड ऑनलाईन अपलोड केल्याच्या तारखेपासून आजपर्यंतचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदार, अंबाजोगाई यांनाही निवेदन देण्यात आले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी या प्रकरणात सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असले तरी, लवकरात लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राणा चव्हाण यांनी दिला आहे. यावेळी समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









