बीड (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील रहिवासी असलेल्या आणि सध्या उल्हासनगर येथे स्थायिक असलेल्या सौ. सुनीता–विक्रम सोनबा मोरे यांच्या सुनबाई तसेच मच्छिंद्र विक्रम मोरे यांच्या पत्नी सौ. पुनम मच्छिंद्र मोरे यांची ठाणे शहर पोलीस शिपाई पदावर निवड झाली आहे. या यशामुळे धानोरा गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सन २०२४–२५ दरम्यान ठाणे येथे ६५४ पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली होती. या भरतीत गृहिणी असलेल्या पुनम मोरे यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्यांनी घवघवीत यश मिळवत ऑनलाइन यादीत ६६ वा क्रमांक मिळवला आहे.
धानोरा गावच्या इतिहासात प्रथमच सुनबाई म्हणून पोलीस दलात निवड होण्याचा मान त्यांनी मिळवला असून त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांचा व गावाचा मान उंचावला आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल गावातील आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच युवक वर्ग आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यशाबद्दल बोलताना सौ. पुनम मोरे यांनी सांगितले की, “या यशामागे माझ्या सासू सुनीता मोरे, सासरे विक्रम मोरे आणि पती मच्छिंद्र मोरे यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी हे यश मिळवू शकले.”
त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील मुली व महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.








