भूम (प्रतिनिधी) – स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून जालना जिल्ह्यातील एका दाम्पत्याची ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना भूम तालुक्यातील देवळाली परिसरात घडली. शुक्रवारी (दि. १) सकाळी सुमारे ९ वाजता ही घटना घडली असून, आरोपींनी चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम व दागिने लुटून नेले.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील भिकाजी वामनराव लोखंडे व त्यांच्या पत्नी छाया लोखंडे यांची ओळख काजल काळे या तरुणीशी झाली होती. विश्वास संपादन केल्यानंतर काजल काळे हिने त्यांना स्वस्त दरात २० तोळे सोने देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला ५० हजार रुपये प्रति तोळा दर सांगून नंतर तो ३५ हजारांवर आणल्याने दाम्पत्याने व्यवहारास होकार दिला.
यासाठी लोखंडे दाम्पत्य जाफराबाद येथून चारचाकी वाहनाने भूम येथे आले. काजल काळे हिने त्यांना आरसोली-देवळाली मार्गे बार्शीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका आडबाजूच्या ठिकाणी, लिंबाच्या बागेजवळ बोलावले. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या तिच्या साथीदारांनी दाम्पत्याला घेरून चाकूचा धाक दाखवत ७ लाख रुपयांची रोख रक्कम तसेच महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले.
घटनेनंतर दाम्पत्याने तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच भूम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटना परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपास परंडा पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.
भिकाजी लोखंडे यांच्या फिर्यादीवरून काजल काळे व हमराज काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.







