शहापूर | प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील नामांकित जनकल्याण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित म. ना. बरोरा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विशेषतः चरिव गावातील कु. स्नेहल संतोष उमवणे हिने 96.40 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावून शाळेसह गाव आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
स्नेहलच्या यशामुळे चरिव गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अत्यंत साध्या आणि बेताच्या परिस्थितीतून शिक्षण घेत असतानाही तिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्नेहलची यशोगाथा प्रेरणादायी ठरत असून, विशेषतः मुलींनी शिक्षणाच्या माध्यमातून मोठे यश मिळवू शकते, हे तिने दाखवून दिले आहे. तिच्या यशामागे कुटुंबीयांचा पाठिंबा तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे बोलले जात आहे.
स्नेहलच्या या उल्लेखनीय यशामुळे शहापूर तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.









