चंदगड :
चंदगड तालुक्यात विकासकामांचा वेग कायम असून नामखोल येथे माजी आमदार राजेश पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या १५ लाख रुपयांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या नूतन सभागृहाचे लोकार्पण उत्साहात संपन्न झाले.
माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते आणि परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ग्रामस्थांना हक्काची जागा उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा निधी मंजूर करण्यात आला होता. नव्याने उभारण्यात आलेल्या या सभागृहामुळे नामखोलसह परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सभापती भरमाणा गावडा, चंदगड पंचायत समिती सभापती विलास नाईक, विजय मोरे, शामराव गावडे गुरुजी, संतोष पाटील, संतोष पवार यांच्यासह नामखोल, मिरवेल आणि इसापूर गावांचे सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासासाठी कटिबद्ध – राजेश पाटील
यावेळी बोलताना माजी आमदार राजेश पाटील यांनी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले ध्येय असल्याचे सांगितले. तळागाळातील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास महिला भगिनी, युवक आणि ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. गावाच्या विकासासाठी उचललेल्या या पावलाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत माजी आमदार राजेश पाटील यांचे आभार मानले.






