जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या पुढाकारामुळे वृद्ध शेतकऱ्याला मिळाला न्याय
लातूर | दि. १५ प्रतिनिधी
एका तलाठ्याच्या चुकीमुळे तब्बल २६ वर्षांपासून सातबारा उताऱ्यावर झालेली चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ८५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला अखेर न्याय मिळाला आहे. लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या संवेदनशील हस्तक्षेपामुळे हा प्रश्न अवघ्या दोन दिवसांत मार्गी लागला.
लातूर येथील प्रभाकर विनायकराव प्रयाग (वय ८५) यांची खोपेगाव शिवारात वडिलोपार्जित शेती आहे. सुमारे २६ वर्षांपूर्वी वासनगाव तलावाच्या कालव्यासाठी परिसरातील काही जमीन संपादित करण्यात आली होती. संबंधित कालवा प्रत्यक्षात त्यांच्या भावाच्या शेतातून गेला होता. मात्र तत्कालीन तलाठ्याच्या चुकीमुळे प्रभाकर प्रयाग यांच्या सातबाऱ्यावरही ‘६ आर’ जमीन संपादित झाल्याची नोंद करण्यात आली.
ही चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी श्री. प्रयाग अनेक वर्षांपासून महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. मात्र तांत्रिक कारणांमुळे हे प्रकरण प्रलंबितच राहिले होते.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित फाईल मागवून घेतली. वृद्ध शेतकऱ्याचे वय आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी संबंधित विभागाला तत्काळ दुरुस्तीचे आदेश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर महसूल प्रशासनाने वेगाने कार्यवाही करत अवघ्या दोन दिवसांत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि त्रुटीमुक्त नवीन सातबारा तयार करण्यात आला. गुरुवार, १४ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभाकर प्रयाग यांना दुरुस्त सातबारा सुपूर्द करण्यात आला.
२६ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाल्याने भावूक झालेल्या प्रभाकर प्रयाग यांनी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांचे मनःपूर्वक आभार मानले.
दरम्यान, महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांमध्ये नागरिकांची दाद घेतली जात नसेल किंवा कोणत्याही कामासाठी विहित शुल्कापेक्षा अधिक पैशांची मागणी होत असल्यास नागरिकांनी तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. तसेच नागरिकांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयातही अर्ज करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.






