पाथरी येथे उपविभागीय अधिकारी व विविध शासकीय कार्यालयांना निवेदन सादर
प्रतिनिधी | अहमद अन्सारी, पाथरी (परभणी)
बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुण तोहीद खान यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी पाथरी शहरातील विविध शासकीय कार्यालयांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तोहीद खान यांच्या हत्येनंतर काही व्यक्तींनी या घटनेबाबत आनंद व्यक्त केल्याचे तसेच अमानवी आणि संवेदनाहीन प्रतिक्रिया दिल्याचे कथितपणे समोर आले आहे. अशा प्रकारच्या वर्तनामुळे समाजामध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होत असून, संबंधित व्यक्तींची भूमिकाही तपासाच्या कक्षेत आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष तपास पथक (SIT) अथवा उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मृत तोहीद खान यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी त्यांच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय नोकरी देण्यात यावी तसेच कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
तोहीद खान हत्या प्रकरण हे सुनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांसह समाजबांधवांकडून करण्यात येत असून, या आरोपांच्या अनुषंगाने संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष, सखोल आणि सर्वंकष तपास व्हावा, अशी मागणी पुढे येत आहे.
हे निवेदन पाथरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाथरी पोलीस स्टेशन तसेच तहसील कार्यालय येथे सादर करण्यात आले.
अर्जदार हाफिज जब्बार खान यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले असून, मुस्लिम समाजातील अनेक नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
