दोंडाईचा | प्रतिनिधी
दोंडाईचा येथील ‘आरसीसी अपंग राऊंड टाऊन’तर्फे दिव्यांग बांधवांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा हृदयस्पर्शी आणि सामाजिक जाणीव वाढवणारा कार्यक्रम शहरातील राम मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात विविध ठिकाणांहून आलेल्या दिव्यांग जोडप्यांचे विवाह विधिवत पार पडले. समाजातील सर्व घटकांच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने या जोडप्यांनी नवजीवनाची सुरुवात केली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक सरकारसाहेब रावल, डॉ. मुकुंद सोहनी, रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन, माजी नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे, प्रतिष्ठित व्यापारी के. एम. अग्रवाल, जवाहर केशवाणी, रमेशचंद्र अग्रवाल, सुनील पुरसवाणी, श्रीमती विजयाताई ठाकोर, मुनिरा विरदेलवाला आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सरकारसाहेब रावल यांनी प्रत्येक नवदांपत्याला संसारोपयोगी वस्तूंसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच ‘रोटरी अपंग राऊंड टाऊन’च्या वतीने ‘कपडा बँक’ उपक्रमातून वधू-वरांना कपडे व साड्यांचे वाटप करण्यात आले.
याशिवाय ‘रोटी बँक’च्या माध्यमातून गरजू नागरिकांना दररोज दोन वेळचे भोजन दिले जाते, अशी माहिती आयोजकांनी दिली.
संस्थेचे कार्यकर्ते हुसैन विरदेलवाला यांनी सांगितले की, “दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवत आहोत. विवाहासारख्या महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांना मदतीचा हात देणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे.”
या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असून दिव्यांग बांधवांप्रती सहानुभूती, आपुलकी आणि सहकार्याची भावना अधिक दृढ झाली आहे. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन अत्यंत उत्कृष्टरीत्या करण्यात आले होते. उपस्थितांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
