शहादा | दि. ३०
महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक संवर्गातील सेवा ज्येष्ठ शिक्षकांना डावलून सुरू असलेली पदोन्नती प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभरातील शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा शिक्षक कृती समन्वय समिती यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी कल्पना ठुबे यांना निवेदन देण्यात आले.
शासनाने संबंधित विभाग, शासन निर्णय, न्यायालयीन आदेश आणि सेवा नियमांचा सखोल अभ्यास करून संपूर्ण राज्यासाठी एकसमान धोरण जाहीर करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला.
शिक्षक संघटनांच्या मते, सध्या सुरू असलेल्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये सेवा ज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होत आहे. अण्णा दादू बनसोडे यांनीही या विषयाची गंभीर दखल घेत राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून पदोन्नती प्रक्रियेत एकवाक्यता आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षण विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाकडून संयुक्त अंतिम अहवाल प्राप्त होईपर्यंत पुढील कार्यवाही स्थगित ठेवण्याचे आदेशही देण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
मात्र, काही जिल्ह्यांमध्ये वरिष्ठ पातळीवरील सूचनांकडे दुर्लक्ष करून पदोन्नती प्रक्रिया सुरूच ठेवण्यात येत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये १ सप्टेंबर २०२५ नंतर टीईटी किंवा सीटीईटी पात्रता पूर्ण केलेल्या कनिष्ठ शिक्षकांना वरिष्ठ पदांवर पदोन्नती दिली जात आहे. त्यामुळे २० ते २५ वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या ज्येष्ठ शिक्षकांना कनिष्ठांच्या अधिपत्याखाली काम करावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
तसेच, शासन निर्णयानुसार जिल्हा पदोन्नती समितीची बैठक घेणे आवश्यक असतानाही बहुतांश जिल्ह्यांत अशा बैठका न घेता प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, प्राथमिक शिक्षण संचालकांनी १४ मे २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रामुळे पदोन्नती प्रक्रियेबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामविकास विभागाशी समन्वय न साधता शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र परिपत्रके जारी केल्यामुळे तांत्रिक विसंगती वाढल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे.
यावेळी समन्वय समितीचे पदाधिकारी दादाभाई पिंपळे, सुनील चव्हाण, संतोष कुवर, नरेंद्र महिरे, महेंद्र बैसाणे, शांतीलाल अहिरे, अशोक देसले, संतोष तावडे, नारायण नांद्रे, भगवान सोनवणे, विकास गांगुर्डे, सुनील भोई आणि गोविंद पाटील यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
