वसुली करतानाचा व्हिडिओ व्हायरल; जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
नांदेड | प्रतिनिधी :
नांदेड जिल्ह्यातील उमरी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा वसुली करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी कठोर कारवाई करत दोघांनाही सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
उमरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुनील कोलबुद्धे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद आवेज हे २३ जून रोजी उमरी ते धर्माबाद मार्गावर शासकीय दुचाकीवर कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांनी वाहनधारकांकडून थेट वसुली केल्याचा प्रकार समोर आला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली.
व्हायरल व्हिडिओमधील प्रकारामुळे जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांचे वर्तन गंभीर, गैरशिस्तीचे आणि आक्षेपार्ह असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. त्यानुसार मुंबई पोलीस अधिनियम १९५१ तसेच महाराष्ट्र पोलीस नियम १९५६ मधील तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी ३० जून रोजी दोघांच्या निलंबनाचे आदेश दिले.
या कारवाईनंतर नांदेड जिल्हा पोलीस दलात शिस्त आणि पारदर्शकतेबाबत स्पष्ट संदेश गेला आहे. आगामी काळात पोलीस दलात कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, भ्रष्टाचार अथवा शिस्तभंग खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी दिला आहे.
या कारवाईमुळे पोलीस दलात कर्तव्य बजावताना अधिक सतर्कता आणि जबाबदारीने काम करण्याची गरज अधोरेखित झाली असून, जिल्हाभर या निर्णयाची चर्चा सुरू आहे.
