सिन्नर : तालुक्यातील गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भगूर–पांढुर्ली रस्त्याच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. या निर्णयाचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आपल्या आंदोलनाला दिले आहे. पक्षाचे सिन्नर तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या ‘सरण आंदोलनानंतर’ शासनाने रस्त्याच्या कामाला मंजुरी देत युद्धपातळीवर काम सुरू केल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.
भगूर–पांढुर्ली मार्गावरील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. पांढुर्ली, शिवडे, घोरवड, धोंडबार, बेलू परिसरातील नागरिकांसह सिन्नर–घोटी मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठमोठ्या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहतूक धोकादायक बनली होती.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यामुळे अनेक अपघात घडले असून अनेकांना दुखापती झाल्या आहेत. शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिकांमधून रुग्णांची ने-आण करतानाही मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. विशेषतः गर्भवती महिलांना रुग्णालयात नेताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या प्रश्नावर अनेक वेळा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र अपेक्षित कार्यवाही न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे धाव घेतली. त्यानंतर शेतकरी व कार्यकर्त्यांसह करण्यात आलेल्या ‘सरण आंदोलनानंतर’ शासनाने रस्त्याच्या कामाला मंजुरी दिल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. तसेच शासनाने नागरिकांच्या मागणीची दखल घेत काम सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
या आंदोलनासाठी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, निरीक्षक भुसारा सर, खासदार भगरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
आंदोलनात तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्यासह पुंजाराम हारक, रतन तुपे, शिवाजी गुंजाळ, नामदेव वाजे, नारायण शेळके, शिवराम बर्कले, चिंधू गुंजाळ, राहुल रूपवते, संतुजी वाजे, लक्ष्मण तुपे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
