निलंगा, दि. ०६ : निलंगा तालुक्यातील बोटकूळ ग्रामपंचायतीमधील विविध विकासकामांमध्ये पारदर्शकता यावी आणि संभाव्य आर्थिक गैरव्यवहारांना आळा बसावा, या उद्देशाने राजमुद्रा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये (RTI) अर्ज दाखल केले आहेत. ग्रामपंचायतीच्या कामकाजाची सखोल पडताळणी करण्यासाठी विविध कागदपत्रांची मागणी करण्यात आल्याने स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली आहे.
यावेळी उबाठा शिवसेना गटाचे तालुका उपाध्यक्ष प्रदीप पाटील तसेच राजमुद्रा प्रतिष्ठानचे स्वप्निल मोरे, भागवत मोरे आणि संदेश मोरे उपस्थित होते. त्यांनी ग्रामपंचायतीकडे विविध विकासकामांचे मंजुरी आदेश, खर्चाचा तपशील, कामांचे अंदाजपत्रक तसेच संबंधित कागदपत्रांची अधिकृत माहिती मागितली आहे.
ग्रामपंचायतीच्या कारभारात अनागोंदी असल्याचा आरोप करत नागरिकांचा निधी योग्य पद्धतीने खर्च होत आहे का, याची माहिती घेण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आल्याचे अर्जदारांनी सांगितले. ग्रामपंचायतीतील विकासकामांमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, अर्ज स्वीकारल्यानंतर ग्रामसेवकांनी माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदीनुसार ३० दिवसांच्या आत मागितलेली सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले आहे.
आता ग्रामपंचायतीच्या कामकाजातील कोणत्या बाबी समोर येतात आणि पुढे प्रशासकीय स्तरावर काय हालचाली होतात, याकडे बोटकूळ ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
