दापोली | प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने (IMD) रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ तसेच राज्य शासनाच्या संबंधित परिपत्रकानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ, दरडी कोसळण्याचा धोका आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे.
सुट्टी लागू असलेल्या संस्था:
- अंगणवाड्या
- पूर्व प्राथमिक शाळा
- सरकारी व खासगी प्राथमिक शाळा
- माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा
- जिल्हा परिषद व नगरपालिका शाळा
- अनुदानित व विनाअनुदानित शाळा
- आश्रमशाळा
- सर्व महाविद्यालये
- आयटीआय व व्यावसायिक प्रशिक्षण संस्था
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाले व धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
