प्रलंबित कामांना तातडीने सुरुवात करण्याची मागणी; भागाजी धोंडबा शिवरतवाड व संजय गणपतराव पसलवाड उपोषणावर
ता. उमरखेड :
चातारी येथील प्रलंबित विकासकामांना तातडीने सुरुवात करण्यात यावी, या मागणीसाठी भागाजी धोंडबा शिवरतवाड व संजय गणपतराव पसलवाड यांनी
आज, दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय, चातारी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
ब्राह्मणगाव ते चातारी तसेच चातारी ते कारखेड या रस्त्यांचे बांधकाम तातडीने करणे, वॉर्ड क्रमांक 3 व 4 मधील प्रलंबित विकासकामे सुरू करणे, झोपडपट्टी तसेच गावातील झेंडा चौकाकडे येणाऱ्या शेत, कॅनॉल व पांदण रस्त्यावरील पाण्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि कॅनॉल व वादळामुळे घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देणे, अशा प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून कागदोपत्री आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू झालेल्या या आमरण उपोषणामुळे चातारीतील प्रलंबित विकासकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन कोणती ठोस भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.




