सहा तासांनंतर तहसीलदारांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद; पाच दिवसांत कार्यवाहीचे आश्वासन
वडगाव पंगू, ता. चांदवड : चांदवड तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, शेतपिकांचे तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी भागवत राजाराम झाल्टे यांनी सोमवारी वडगाव पंगू येथे सुमारे २०० फूट उंच टॉवरवर चढून अन्नत्याग आंदोलन सुरू केले.
सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या आंदोलनानंतर तहसीलदार अनिल पाटील, पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे तसेच महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांशी थेट चर्चा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका झाल्टे यांनी घेतली.
सुमारे सहा तासांनंतर तहसीलदार अनिल पाटील यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकाऱ्यांशी झाल्टे यांचा दूरध्वनीवरून थेट संवाद घडवून आणण्यात आला. दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसान व शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पाच दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर झाल्टे यांनी आंदोलन मागे घेत टॉवरवरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.
चांदवड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करणे, पीक पंचनामे करणे आणि शेतकऱ्यांना आवश्यक मदत देण्याबाबत पाच दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा भागवत झाल्टे यांनी दिला आहे.
दरम्यान, वडगाव पंगू, कातरवाडी, वागदर्डी, तळेगाव रोही, निंबाळे आदी परिसरातील शेतकरी आंदोलनस्थळी उपस्थित होते. आता प्रशासनाने दिलेल्या पाच दिवसांच्या आश्वासनाकडे चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.









