ग्रामस्थांची दक्षता; अजगराला सुरक्षितपणे जंगलात सोडले
पेण प्रतिनिधी: पेण तालुक्यातील वरसई गावात रात्रीच्या सुमारास संदेश मानकावळे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात भला मोठा अजगर आढळून आल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तातडीने सर्पमित्रांना पाचारण केले.
वरसई तरुण युवक मित्र मंडळ व ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घेत परिसरातील नागरिकांना अजगरापासून कोणतीही इजा होऊ नये, तसेच घबराट निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेतली. सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहोचून कौशल्याने अजगराला सुरक्षितपणे पकडले.
वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अजगराला कोणतीही इजा न करता त्याची सुटका करण्यात आली. त्यानंतर सर्पमित्रांनी अजगराला सुरक्षितपणे जंगल परिसरात नेऊन सोडले. त्यामुळे एका वन्यजीवाला जीवदान मिळाले.
दरम्यान, रायगड जिल्हा भाजप नेते शिवाजी पाटील यांनी ग्रामस्थांना अजगराला मारू नये, असे आवाहन केले. सर्पमित्रांना बोलावून त्याला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडावे, अशी सूचना त्यांनी ग्रामस्थांना केली.
ग्रामस्थांनी दाखविलेली संयमित भूमिका आणि सर्पमित्रांनी केलेल्या सुरक्षित रेस्क्यूमुळे अजगराला जीवदान मिळाले. या घटनेतून वन्यजीवांविषयी संवेदनशीलता आणि मानव-वन्यजीव सहअस्तित्वाचा संदेशही मिळाला.








