
भडगाव | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी भडगाव भाजपा कार्यालयात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात संपन्न झाली. प्रदेश सचिव सौ. देवयानीताई बडगुजर, जिल्हाध्यक्षा ॲड. कृतिकाताई आफ्रे, जिल्हा सरचिटणीस सौ. नूतनताई पाटील आणि भाजपा नेत्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.
बैठकीत भडगाव तालुक्यातील प्रत्येक बूथवर सक्षम महिला कार्यकर्त्यांची फळी उभारण्यासोबतच अधिकाधिक महिलांना पक्षाच्या विचारधारेशी जोडण्यावर भर देण्यात आला.
प्रदेश सचिव सौ. देवयानीताई बडगुजर यांनी महिला मोर्चाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक बूथवर सक्रिय महिला कार्यकर्त्यांची टीम उभी करण्याचे आवाहन केले. महिलांनी केवळ संघटनेचा भाग न राहता नेतृत्वाची भूमिका स्वीकारून समाजातील विविध प्रश्नांसाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. तसेच भाजपाची विचारधारा आणि शासनाच्या महिला कल्याणकारी योजनांची माहिती घराघरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाध्यक्षा ॲड. कृतिकाताई आफ्रे यांनी महिलांशी सातत्याने संपर्क ठेवण्याची गरज व्यक्त केली. महिलांची संघटित शक्ती ही पक्षाची महत्त्वाची ताकद असून, प्रत्येक भगिनीला संघटनेशी जोडून सक्षम महिला नेतृत्वाची फळी निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात महिला मोर्चाला अधिक व्यापक आणि गतिमान करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
भाजपा नेत्या सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव परिसरातील महिला कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले. महिलांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे उभे राहणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविणे हे महिला कार्यकर्त्यांचे महत्त्वाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हा चिटणीस सौ. मिनाताई बाग, शहराध्यक्षा सौ. योगिता अनिल वाघ, सौ. चंद्रकला पाटील, स्नेहल पाटील, सुरेखा वाघ, सुनीता शिंपी, गायत्री बिरारी, मोनाली बागल, चंदा पाटील, ज्योती पाटील, मीनाक्षी पाटील, सुनिता पाटील, शहर सरचिटणीस लता सपकाळे, शहर उपाध्यक्ष अनिता भोई व कल्पना भंडारी, मोनी पाटील, यशोदा सोनार, मनिषा भिल्ल, समा शेख, मोनिका पाटील, चिटणीस सलमाबी शेख, अरुणा ठाकरे, उषाबाई भिल्ल, मायाबाई भिल्ल, लक्ष्मी भिल्ल, छाया भिल्ल, लता भिल्ल, आरती सूर्यवंशी, आशा सूर्यवंशी, रूख्मा भिल्ल, अनिता भिल्ल, योगिता धोत्रे यांच्यासह भडगाव तालुक्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बैठकीचे सूत्रसंचालन सौ. चंद्रकला पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ. योगिता वाघ यांनी केले.
भडगाव तालुक्यातील प्रत्येक बूथवर सक्षम महिला संघटन उभारून भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक ताकद आणखी वाढविण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला.









