सुवासिनींकडून विधिवत पूजा, ओटी भरण्याचा पारंपरिक सोहळा; गायीला हिरवा व सुका चारा भेट देत जपली सामाजिक बांधिलकी
श्रीगोंदा | प्रतिनिधी : सध्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बळीराजा संकटात असताना पशुधनाची काळजी घेण्याबरोबरच भारतीय संस्कृती जपण्याचा अनोखा उपक्रम श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे पाहायला मिळाला. येथील सांगळे बंधूंनी आपल्या लाडक्या गायीचे पारंपरिक पद्धतीने डोहाळे जेवण घालून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला.
या अनोख्या सोहळ्यासाठी परिसरातील अनेक महिला भगिनींना सुवासिनी म्हणून विशेष निमंत्रित करण्यात आले होते. महिलांनी गायीची विधिवत पूजा करून तिला हळद-कुंकू लावले आणि ओटी भरली. यावेळी पारंपरिक गाणीही गायण्यात आली. कार्यक्रमाला गावातील मान्यवर आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि चाऱ्याची टंचाई लक्षात घेता या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडले. उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांनी गायीला आहेर म्हणून हिरवा व सुका चारा भेट दिला.
दुष्काळाच्या कठीण परिस्थितीतही मुक्या जनावरांप्रती असलेली आत्मीयता आणि गोवंश संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. सांगळे बंधूंच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.











