हत्तींचे स्थलांतर, वाढीव नुकसानभरपाई आणि सौरकुंपणाच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक
दोडामार्ग : प्रतिनिधी
वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे तसेच शेती व बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने त्रस्त झालेल्या पाळये दशक्रोशी परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. ‘गाव पाळये दशक्रोशी हत्ती-वन्यप्राणी हटाव कृती समिती, दोडामार्ग’च्या वतीने शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता मुक्काम पाळये, पोस्ट तेरवण मेढे, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग येथे उपोषण करण्यात येणार आहे.
श्री. गणपत दळवी यांच्या मालकीच्या जमिनीत हत्तीने उद्ध्वस्त केलेल्या बागायतीमध्ये हे उपोषण करण्यात येणार असून, वन्यप्राण्यांच्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
या उपोषणाला दोडामार्ग तालुका विकास मंडळ (मुंबई), सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी पदवीधर संघ यांच्यासह परिसरातील १२ विविध शेतकरी व व्यापारी संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
हत्तींचे स्थलांतर करण्याची मागणी
हत्तींच्या अधिवासाबाबत शासनाचा ठोस निर्णय होईपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींचे ‘वनतारा’सारख्या संस्थांमध्ये स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी कृती समितीने केली आहे.
नुकसानभरपाईत वाढ करण्याची मागणी
वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या वनस्पतींमध्ये बांबूचा समावेश करून प्रति काठी १०० रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी. तसेच मंजूर नुकसानभरपाईची रक्कम एका महिन्याच्या आत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पूर्वीच्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करा
दि. ११ सप्टेंबर २०२३ रोजी सावंतवाडी येथे तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्यानुसार नारळासाठी प्रति झाड ३० हजार रुपये, काजूसाठी २० हजार रुपये, आंब्यासाठी ३० हजार रुपये, सुपारीसाठी २० हजार रुपये, केळीसाठी ८०० रुपये तसेच भातासाठी प्रति गुंठा ७०० रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी समितीने केली आहे.
मृतांच्या वारसांना मदत व सौरकुंपणाची मागणी
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे व बागायतींचे संरक्षण करण्यासाठी १०० टक्के अनुदानावर सौरकुंपण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
बाधित शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
“मनुष्य वाचवा – वन्यप्राणी हटाव” असा नारा देत कृती समितीने आपल्या मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या उपोषणात परिसरातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.






