आर्थिक व प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप; २०२२ ते २०२६ मधील निधी, विकासकामे व लेखापरीक्षणाची माहिती तपासण्याची मागणी
नांदुरा, दि. ३० सप्टेंबर (प्रतिनिधी) : खंडाळा ग्रामपंचायतीच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य अनीता विलास मेढे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती नांदुरा यांच्याकडे सविस्तर चौकशीची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे. या निवेदनामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत चर्चा सुरू झाली आहे.
निवेदनानुसार, ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत ग्रामस्थांमध्ये विविध शंका, तक्रारी आणि संभ्रमाचे वातावरण असल्याचा दावा करण्यात आला आहे. शासनाकडून प्राप्त निधीचा वापर, विविध विकासकामांची अंमलबजावणी, ग्रामसभांचे आयोजन तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी याबाबत सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अनीता मेढे यांनी सन २०२२ ते २०२६ या कालावधीत ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या सर्व निधीचा तपशील, करण्यात आलेला खर्च आणि त्याची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. तसेच विविध विकासकामांच्या प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, कार्यादेश, मोजमाप पुस्तिका (एमबी), बिले आणि पूर्णता प्रमाणपत्रांची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय ग्रामपंचायतीच्या उत्पन्न व खर्चाच्या लेखापरीक्षण अहवालासह १५ वा व १६ वा वित्त आयोग निधी, सामान्य निधी, बँक स्टेटमेंट आणि कॅशबुकच्या छायांकित प्रती उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषद बुलढाणा मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती नांदुरा गटविकास अधिकारी तसेच मलकापूर मतदारसंघाच्या आमदारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन चौकशी करणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायतीच्या निधीचा वापर आणि विकासकामांच्या अंमलबजावणीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची वस्तुस्थिती चौकशीअंती स्पष्ट होणार का, याबाबत खंडाळा परिसरात चर्चा सुरू आहे.







