‘टीबी मुक्त भारत’ अभियानांतर्गत आरोग्य विभागाचा उपक्रम; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सुरेगाव रस्ता (प्रतिनिधी)
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान, सेवा संकल्प तसेच ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र भारम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवर्धिनी केंद्र देवठाण (उपकेंद्र देवठाण) यांच्या वतीने रस्ते सुरेगाव येथे मोफत छाती एक्स-रे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवारी (दि. ३०) ग्रामपंचायत कार्यालय, रस्ते सुरेगाव येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर उत्साहात पार पडले.
या शिबिरात ग्रामस्थांची मोफत छाती एक्स-रे तपासणी करण्यात आली. क्षयरोगाचे (टीबी) लवकर निदान व्हावे, संशयित रुग्णांचा शोध घेता यावा आणि नागरिकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, हा शिबिरामागील प्रमुख उद्देश होता. गावातच मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला राहणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे किंवा छातीत दुखणे यांसारखी लक्षणे असलेल्या नागरिकांनी तपासणी करून घेतली. तपासणीदरम्यान संशयित लक्षणे आढळलेल्या नागरिकांना पुढील तपासणी, उपचार व आवश्यक आरोग्यसेवांबाबत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
क्षयरोगाचे वेळेत निदान आणि नियमित उपचार यामुळे रोग नियंत्रणास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी दीर्घकाळ राहणाऱ्या खोकल्यासह इतर लक्षणांकडे दुर्लक्ष न करता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.
या शिबिरासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. श्वेता पेटकर (खानापुरे), आरोग्य सेवक अजय राठोड, बाळासाहेब कदम, संदीप चव्हाण, विक्रम तुबांरे तसेच आशा सेविका मीना चव्हाण, मनीषा कदम, नंदा लावरे, मथुरा शिंदे आणि कावेरी अहिरे यांनी उपस्थित राहून शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केले.
‘टीबी मुक्त भारत’ अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर तपासणी, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवांना चालना दिली जात आहे. रस्ते सुरेगाव येथे आयोजित या शिबिरामुळे ‘निरोगी गाव, सक्षम गाव’ या संकल्पनेला बळ मिळाले.








