दुर्गा देवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअपला ट्रकची धडक; अनेक जण जखमी
वर्धा : प्रतिनिधी
वर्धा : समृद्धी महामार्गावर धामणगाव रेल्वे तालुक्यातील तलणी परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुर्गा देवीची मूर्ती घेऊन वर्ध्याच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअपला ट्रकने जोरदार धडक दिल्याने या दुर्घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेगाव येथून दुर्गा देवीची मूर्ती घेऊन बोलेरो पिकअप वर्ध्याच्या दिशेने निघाली होती. या वाहनाला ट्रॉली जोडलेली होती आणि वाहनामध्ये सुमारे २० ते २३ नागरिक प्रवास करत होते. रात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील चैनल क्रमांक ९७ जवळ तलणी परिसरात ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. धडकेनंतर पिकअप वाहन पलटी झाले.
या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अपघातातील अनेक जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवून जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात आले. मृत व जखमींना धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील सावंगी मेघे रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच धामणगावच्या महापौर डॉ. अर्चना अदसाड रोठे तसेच विधानसभा अध्यक्ष रावसाहेब रोठे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि आवश्यक मदतीबाबत संबंधितांना सूचना दिल्या.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश ताथोड, दत्तापूर पोलीस ठाण्याचे गजानन महेत्रे, तळेगाव पोलीस ठाण्याचे किरण ओटे, मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय आत्राम, तहसीलदार अभय घोरपडे तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या दुर्घटनेनंतर धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मृतांची ओळख पटविणे तसेच जखमींची अधिकृत संख्या निश्चित करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास पोलीस करीत आहेत.








