पिंपळदरी येथील शेतकरी महिला मंगलाबाई शिरसाट यांची वन विभागाकडे तातडीच्या मदतीची मागणी
पिंपळदरी, प्रतिनिधी : सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेळ्या दगावल्याची घटना घडली असून, शेतकरी महिला मंगलाबाई शिरसाट यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला असला तरी अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगलाबाई शिरसाट यांच्या शेळ्या शेतात चरण्यासाठी गेल्या असताना वन्यप्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात काही शेळ्या दगावल्या. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
या घटनेत सुमारे २३ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी महिलेने सांगितले. मात्र पंचनामा होऊनही अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शेळीपालनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने नुकसानभरपाईची रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणी मंगलाबाई शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील वन विभागाकडे ऑनलाइन ई-मेलद्वारे केली आहे.
वन विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नियमानुसार नुकसानभरपाईची कार्यवाही पूर्ण करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.








