कमी पर्जन्यमानाचा सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका; पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या अपेक्षा
लातूर, दि. २ ऑक्टोबर २०२६ : मुरुड महसूल मंडळातील मुरुड येथे श्री. रामदास नाडे (प्रिया इलेक्ट्रिकल) यांच्या शेतात सोयाबीन पिकाचा पीक कापणी प्रयोग करण्यात आला. यावेळी अर्ध्या गुंठ्यातील सोयाबीन कापून मळणी करून त्याचे वजन करण्यात आले. या प्रयोगात अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन उत्पादन मिळाले.
या प्रमाणानुसार एक हेक्टर क्षेत्रात सुमारे ४० ते ४२ किलो सोयाबीन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यावर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानाचा सोयाबीनसह अन्य पिकांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम झाल्याचे या पीक कापणी प्रयोगातून दिसून आले.
पीक कापणी प्रयोगाच्या निष्कर्षांच्या आधारे पीक विम्याच्या नुकसानभरपाईची प्रक्रिया केली जाते. सोयाबीन पिकासाठी हेक्टरी सुमारे ६२ हजार रुपये विमा संरक्षण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र सोयाबीनची पेरणी, मशागत, बियाणे, खते आणि काढणीपर्यंतचा खर्च लक्षात घेता उत्पादनात मोठी घट झाल्यास शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी नमूद केले.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र लातूर जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांपैकी केवळ चार मंडळांना पीक विम्याचा लाभ मिळाल्याचा दावा यावेळी करण्यात आला. यंदा कमी पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली असल्याने पीक विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य पद्धतीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
तसेच राज्य सरकारनेही यावर्षीच्या दुष्काळजन्य परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना मदत व अनुदान देताना आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या पीक कापणी प्रयोगावेळी मुरुड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री. हनुमंत (बापू) नागटिळक, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. रवी (तात्या) नाडे, श्री. विष्णू घुटे, श्री. गोकुळ चांडक तसेच मुरुड महसूल विभागाचे मंडळ अधिकारी श्री. राहुल भोसनर, तलाठी श्री. कमलाकर आरडले, तलाठी श्री. गोपाळ शिंदे, कृषी सहाय्यक श्री. अमोल बनसोडे, कृषी सहाय्यक श्री. विनायक बारबोले, विमा कंपनीचे प्रतिनिधी श्री. शिंगे, श्री. प्रवीण सोनवणे, श्री. विश्वास नाडे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.







