प्रशासकीय दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; तातडीने सुविधा मंजूर करण्याची मागणी
शिंदेवाडी | प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील सुमारे शंभर वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, शिंदेवाडीने महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेला ‘आदर्श शाळा’ म्हणून गौरविण्यात आले आहे.
शाळेच्या या यशामागे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांचे मोठे योगदान आहे. ग्रामस्थांच्या लोकसहभागातून सुमारे २० लाख रुपयांचा निधी उभारून जीर्णावस्थेकडे गेलेल्या शाळेचा कायापालट करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मात्र, उत्कृष्ट कामगिरी करूनही शिंदेवाडी शाळेला शासनाच्या ‘IDEAL Center’ (Interactive Digital, Experimental, Administration & Learning Center) अर्थात संगणक कक्ष व व्हर्च्युअल क्लासरूम सुविधेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ लतेश शिंदे, वैभव कुलकर्णी, नितीन मगर, राहुल तनपुरे तसेच पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि माजी विद्यार्थ्यांच्या वतीने माळशिरस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी महेश गवळी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात आले.
शिंदेवाडी शाळेला तातडीने ‘IDEAL Center’ मंजूर करून कार्यान्वित करावे, तसेच भविष्यात शाळेसाठी उपलब्ध होणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात घेऊन देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी गटशिक्षणाधिकारी महेश गवळी यांनी सकारात्मक चर्चा करत संबंधित मागणीचा तातडीने पाठपुरावा करून लवकरात लवकर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांबाबत प्रशासनाने दिरंगाई करू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली असून, मागणीची पूर्तता न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी शिंदेवाडीचे ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







