शहादा,दि.11(का.प्र.)
कहाटूळ (ता. शहादा) येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने सानुग्रह अनुदानातून एकूण 626 सभासदांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये एक हजार रुपयांपेक्षा जास्त शेअर्स रक्कम असलेल्या सभासदांना खुर्ची, शंभर ते एक हजार रुपयांपर्यंत शेअर्स रक्कम असलेल्यांना पाण्याचा जार, तर 50 ते शंभर रुपये शेअर्स रक्कम असलेल्या सभासदांना टोपल्यांचे वाटप करण्यात आले.हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन प्रवीण पाटील, व्हाईस चेअरमन संगीता पाटील, महिला संचालिका रेखा पाटील व विमलबाई देवचंद माळी, संस्थेचे सचिव नारायण कन्हैयालाल सैंदाणे आणि सर्व संचालकांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रसंगी गटनेते राजाराम दगडू पाटील यांच्यासह संचालक रामकृष्ण बाबू पाटील, रतिलाल नारायण पाटील, सुक्राम गोरख ठाकरे, विठ्ठल निमजी पाटील, दिलीप मधुकर पाटील, भगवान पाटील, दीपक शरदचंद्र कुलकर्णी आणि परिसरातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना कहाटूळचे माजी उपसरपंच प्रवीण जाधव पाटील यांनी सांगितले की, “संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत कधीही सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले नव्हते. हे पहिलेच वर्ष आहे की सभासदांना सानुग्रह अनुदान दिले जात आहे.” यामुळे सर्व सभासदांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातही सभासदांना शेतीपूरक वस्तू देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच ज्या सभासदांची शेअर्सची रक्कम अपूर्ण आहे, त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करून आपली वस्तू घेऊन जावी, असे आवाहनही त्यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव नारायण सैंदाणे यांनी विशेष परिश्रम घेतले आणि शेवटी उपस्थितांचे आभार मानले.











