नागपूर, ठाणे, पालघर, छ. संभाजीनगर, पुणे, सातारा,अमरावती,नाशिक,आणि कोकणातील आरोग्यसेवेला बळकटी
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी 7218275486
मुंबई, दि. 11 : 01 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर पर्यंत होणाऱ्या “आरोग्य संवाद यात्रे” दरम्यान राज्यातील सुमारे 125 आरोग्य संस्थांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाचे वतीने 15 ऑगस्ट 26 रोजी राज्यातील पहिल्या टप्प्यातील 124 आरोग्य संस्थांचे लोकार्पण करण्यात आले होते. आरोग्याच्या पायाभूत सुविधा बळकट करून, महाराष्ट्राला आरोग्य संपन्न बनवण्याच्या दिशेने दुसऱ्या टप्प्यातील आरोग्य संस्थांचे लोकार्पण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
राज्यातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळ, घराजवळ उत्तम दर्जेदार व तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत “आरोग्य संपन्न महाराष्ट्र’ घडवण्याच्या प्रक्रियेत हा दुसरा टप्पा महत्त्वाचा मानला जात असुन, आगामी काळात राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील आणखी 250 आरोग्य संस्था नागरिकांच्या सेवेत रुजू करण्याचा दृष्टीने युद्धपातळीवर कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांचे अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व आरोग्य संस्थांची बांधकामे, मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे, फर्निचर, विज,पाणी जोडणी व इतर आवश्यक पायाभूत सुविधाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त श्री.संजय काटकर, वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बापू पवार, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, सार्वजनिक बांधकाम (PWD)विभागाचे कार्यकारी अभियंता, पायाभूत सुविधा (IDW) कक्षाचे कार्यकारी अभियंता, संबंधित विभागांचे उपसचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व परिमंडळातील उपसंचालक, राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक तसेच संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणाली द्वारे या बैठकीला उपस्थित होते.
आरोग्य संस्थांचे बांधकाम पूर्णत्वास येत असतानाच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विभागाच्या निर्णयामुळे अल्प काळात दुसऱ्या टप्प्यातील नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक,पुणे, ठाणे,पालघर, सातारा व कोकण विभागातील 125 आरोग्य सुविधा नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होत आहेत. यामध्ये उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालय, प्रशिक्षण संस्था अशा विविध आरोग्य संस्थाचा समावेश आहे..
यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. अपघातग्रस्त, माता-बालक, ज्येष्ठ नागरिक, तसेच आपत्कालीन रुग्णांना स्थानिक स्तरावरच अधिक गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर उपचार मिळणार आहेत. याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांनाही अधिक सुसज्ज कार्यपरिसर उपलब्ध होणार आहे.
याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने आरोग्य सेवा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. “सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा” हे राज्य शासनाचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साकार करण्याच्या दिशेने हा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.











