परभणीत पोलिसांचाच मोठा ‘झोल’!
पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी!
पाथरी :प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी 7218275486
खाकी वर्दीच्या आडोशाने बेकायदेशीर धंदेवाईकांना अभय देणारा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे समोर आला आहे. पाथरी पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे जप्त केलेले हायवा वाहन (क्र. MH-23-W-2782) बेकायदेशीरपणे सोडण्यासाठी चक्क तहसीलदारांच्या नावाचा बनावट आणि खोटा आदेश वापरल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. तक्रारदार उत्तम अमृतराव झिंजुर्डे यांनी या प्रकरणी थेट पोलीस अधीक्षक, परभणी आणि पोलीस महानिरीक्षक,नांदेड यांच्याकडे पुराव्यानिशी लेखी तक्रार दाखल करून पोलीस निरीक्षकावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे.
दिनांक २९ मार्च २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने अवैध वाळूची वाहतूक करणारा हायवा ट्रक पकडून पोलीस ठाण्यात जमा केला होता. परंतु, पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांनी स्वतःच्या फायद्यासाठी आणि शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून हे वाहन सोडण्याचा पराक्रम केला. यासाठी तहसीलदारांनी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वाळू वाटपाचा आदेश दिला असल्याचे भासवत खोटा दस्तावेज तयार करण्यात आला व तोच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसमोर खरा म्हणून सादर केला गेला. मात्र,तपासात पाथरी तहसीलदारांनी असा कोणताही आदेश निर्गमित केलाच नसल्याचे उघडकीस आल्याने खाकी वर्दीतील हा बनावटगिरीचा काळा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
एकीकडे तक्रारदाराने वारंवार मागणी करूनही वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते यांना वाचवण्यासाठी चौकशी अहवाल दाबून ठेवत असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
तर दुसरीकडे शासकीय यंत्रणेची दिशाभूल करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणे याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.









