कळंब.तालुका प्रतिनिधी. वसिमखॉं पठाण.
खासदार ओमराजे निंबाळकरांच्या सोबतीने ठाकरे गटाचे दोन्ही आमदार महायुतीच्या वाटेवर..?
धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि उमरगा-लोहाराचे आमदार प्रवीण स्वामी महायुती नेत्यांच्या गोटात ; राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ..!
धाराशिव :
औरंगाबाद विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीचा ज्वर सध्या संपूर्ण मराठवाड्यात शिगेला पोहोचला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या रिंगणात उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराचा धुरळा उडवायला सुरुवात केली आहे. मात्र, प्रत्यक्ष रणसंग्राम सुरू असतानाच धाराशिव आणि मराठवाड्याच्या राजकारणात आणखी एका मोठ्या राजकीय भूकंपाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील तसेच उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी नुकतीच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचे समोर आले असून, या घडामोडीने राजकीय पटलावर प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.
विशेष लक्षवेधी बाब म्हणजे, नुकताच ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत शिवसेना (शिंदे गट) व महायुतीमध्ये प्रवेश केलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आजूबाजूला हे दोन्ही आमदार उभे असल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर याच बैठकीत भाजपचे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि भाजपचे धाराशिव मधील ज्येष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचीही प्रमुख उपस्थिती स्पष्टपणे दिसत असल्याने या संशयाला अधिकच बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे हे दृश्य #भाजपा #कार्यालयातील आहेत की ? सुजितसिंह ठाकूर यांच्या #निवासस्थानातील आहेत याबाबत नागरिकांत कुजबूज सुरू झाली आहे आहे.याचे उत्तर दोन्ही आमदारच देऊ शकतील.
या अनपेक्षित दृश्यामुळे धाराशिवात एकच सवाल उपस्थित केला जात आहे ; उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे दोन्ही शिलेदार अखेर महायुतीच्या वाटेवर निघाले आहेत का..?
📌 महायुतीच्या बड्या नेत्यांसोबत खलबते: ‘मैत्री’ की नवा राजकीय डाव..?
धाराशिवच्या राजकारणात खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची राजकीय व वैयक्तिक मैत्री सर्वश्रुत मानली जाते. ओमराजे यांनी ठाकरे पक्षाची साथ सोडल्यानंतरही कैलास पाटील व प्रवीण स्वामी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे डोळे लागले होते.
आता मात्र एकाच #फ्रेममध्ये खासदार ओमराजे यांच्यासह भाजपचे वजनदार नेते आमदार राजेंद्र राऊत आणि ज्येष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर यांच्या सोबतीने ठाकरे गटाचे दोन्ही आमदार वावरताना दिसल्याने, ही केवळ जुनी मैत्री किंवा औपचारिक भेट नसून ठरवून आखलेली राजकीय रणनीती असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील या भाजप नेत्यांची उपस्थिती या बैठकीचे राजकीय गांभीर्य अधिक स्पष्ट करते..
📌 पदवीधर निवडणुकीचे टायमिंग आणि ‘मातोश्री’ची चिंता..!
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात एका-एका मतासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत निकराची लढत सुरू आहे. अशा नाजूक टप्प्यावर:
📌 ठाकरे गटाला मोठा धक्का: आधीच खासदारांनी पक्षांतर केल्यानंतर आता स्थानिक पातळीवर मजबूत पकड असलेले दोन विद्यमान आमदारही भाजप आणि शिंदे गटाच्या शीर्ष नेत्यांच्या कंपूत दिसू लागल्याने ठाकरे सेनेचे स्थानिक संघटन पूर्णपणे खिळखिळे होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
📌 महायुतीची संयुक्त खेळी:
पदवीधर निवडणुकीत पदवीधरांचे मतदान खेचून आणण्यासाठी आणि विरोधी गोटातील प्रमुख चेहरे स्वतःकडे वळवून निवडणुकीआधीच मानसिक विजय मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्रितपणे ही व्यूहरचना आखल्याचे दिसते.!
📌 केवळ औपचारिक भेट की अंतिम निर्णय..?
अशा भेटींनंतर नेतेमंडळींकडून “ही केवळ विकासकामांसंदर्भातील किंवा वैयक्तिक संबंधातून झालेली भेट होती” असा नेहमीचा बचाव पुढे केला जाण्याची शक्यता असते. मात्र, निवडणुकीच्या रणधुमाळीत, नुकत्याच पक्षांतर केलेल्या खासदारांच्या साक्षीने आणि भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेली ही बैठक साधी-सोपी नक्कीच नाही. पदवीधर निवडणुकीच्या या मोसमात आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी आपली अधिकृत भूमिका काय मांडतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.











