जेवणातून आणि पाण्यातून विषबाधा ? विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर रूग्णालयात उपचार सुरू…..

पालघर :पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रणकोळ आश्रमशाळेतील २८ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जेवणा- तून आणि पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. विषबाधा झालेल्या २८ विद्यार्थिनींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. सविस्तर माहिती अशी की, डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रमशाळेतील २८ विद्यार्थिनींना विषबाधा झाली. जेवणातून आणि पाण्यातून विषबाधा झाल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उलटी आणि जुलाब सुरु झाल्याने २८ विद्यार्थिनींना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी विषबाधा झालेल्या विद्यार्थिनींना तपासून त्यांच्यावर औषधोपचार केले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
विद्यार्थ्यांवर उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले?
विद्यार्थिनींवर उपचार केलेल्या डॉक्टरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, विषबाधा झालेले जवळपास २८ विद्यार्थिनी आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. त्यातील ८ विद्यार्थिनींना आयपीडी करण्यात आले आहे तर उर्वरित २० विद्यार्थिनींना ओपीडीमध्ये ठेवण्यात आले आहे. ८ विद्यार्थिनींचे नुमने आपण तपासणीसाठी पाठवत आहोत. आम्ही सर्वांच्या प्राथमिक तपासण्या केल्या असून सगळ्यांचा रक्तदाब स्थिर आहे तरीही डॉक्टरांच्या निगराणीखाली आम्ही त्यांना ठेवले आहे.
आश्रमशाळेतील एकूण ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा ?
दुसरीकडे मंगळवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील डहाणू विकास प्रकल्पातील १० आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जिल्ह्यातील आश्रमशाळेतील एकूण ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या वृत्तानुसार २८ विद्यार्थ्यांवरच विषबाधा झाल्याचे वृत्त होते. या घटनेने पालघर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर शासकीय यंत्रणांची धावाधाव सुरू झाली आहे.
प्रतिनिधि – अक्षय गायकवाड
८३९०८६६३७०
Discussion about this post