श्रीगोंद्यात भाजपची उमेदवारी बदलण्यासंदर्भात हालचाली गतिमान झाल्या आहेत. सौ.प्रतिभा बबनराव पाचपुते यांच्याऐवजी उवानेते श्री.विक्रम बबनराव पाचपुते यांची उमेदवारी निश्चित होणार असल्याचे समजते. त्यासाठी पक्षीय पातळीवर ‘ग्रीन सिग्नल’ मिळवण्यात पाचपुते कुटुंबियांना यश आल्याची खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे.
श्रीगोंद्यात भाजपची उमेदवारी आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातच मिळणार हे निश्चित मानले जात होते. त्यासाठी विक्रम पाचपुते यांचे नाव आघाडीवर होते. परंतु भाजपने प्रसिध्द केलेल्या पहिल्याच यादीत श्रीगोंद्यातून आ. बबनराव पाचपुते यांच्या पत्नी सौ.प्रतिभा पाचपुते यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्याचदिवशी आ. बबनराव पाचपुते व प्रतिभा पाचपुते हे उमेदवारी बदलण्याची मागणी घेऊन मुंबईकडे रवाना झाले होते. प्रतिभा पाचपुते यांच्याऐवजी विक्रम पाचपुते यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत केली होती. फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ही मागणी मागे पडली होती.
गेल्या चार दिवसांत भाजपची उमेदवारी बदलण्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी आज(ता. ३१) आमदार बबनराव पाचपुते यांच्या शहरातील माऊली निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीचा अहवाल पक्षाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी बदलाचा निर्णय होणार असल्याचे समजते. शिवाय, उमेदवार बदलासाठी आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबियांना पक्षीय पातळीवरून ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याची माहिती समजली. त्यामुळे आता श्रीगोंद्यात भाजपतर्फे सौ.प्रतिभा पाचपुते यांच्याऐवजी श्री.विक्रम पाचपुते हे उमेदवार असू शकतील.
Discussion about this post