यावल प्रतिनिधी फिरोज तडवी
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुका विधी सेवा समितीच्या वतीने डांभुर्णी येथील डॉ.दि.स. चौधरी विद्यालयात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 याविषयी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
अलीकडच्या काळात बालकांवर लैंगिक अत्याचाराच्या काही घटना समोर आल्या आहेत. अशा घटनांमध्ये बालकांचा मानसिक आणि शारीरिक छळ होऊन त्यांच्यात भीती निर्माण होऊन न्यूनगंडपणा बळावतो. असे बालक समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले जातात. त्यांचा सर्वांगीण विकास करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. बालकांच्या मानवी हक्काच्या दृष्टीनेही अशा घटनांचे निर्मूलन होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने, जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्याच्या हेतूने, यावल तालुका विधी सेवा समिती चे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश सन्माननीय श्री.आर.एस.जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच डांभुर्णी येथे ‘पोस्को’ अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री शशिकांत वारूळकर हे होते. आपल्या वक्तव्यातून त्यांनी बालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपले शरीर हा आपला अधिकार आहे त्याला आपल्या परवानगीशिवाय कोणालाही स्पर्श करण्याचा हक्क नाही तसेच मुलांनी चॉकलेट, भेटवस्तू अथवा मोबाईल सारख्या आमिशांपासून दूर राहिले पाहिजे. अशा कुठल्याही आमिषाला आपण स्वतःहून बळी पडायला नये”. यावेळी त्यांनी ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच‘ ही संकल्पना ही मुलांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. यु .जे.महाजन हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर.ए.निळे सरांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी, समांतर विधी सहाय्यक हेमंत फेगडे तसेच डॉ. दि.स. चौधरी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post