माळरानावर माणसांच्या सततच्या वावरण्याने पावलांनी निर्माण झालेली छोटीशी व ठळक स्पष्ट दिसणारी पायवाट म्हणजे ‘चोळवा ‘ होय.
✒️✒️ राजेंद्र टोपले
आदिवासींची गावं ही डोंगराळ भागात, दरी खोऱ्यात, सपाट असलेल्या माळरानावर तसेच निसर्गाच्या कुशीत वसलेले असल्याने पूर्वीपासून उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूत शेतकरी, कष्टकरी व मजूरदार वर्ग आपल्या शेतातील कामे करण्यासाठी किंवा वाहतूक करण्यासाठी जंगलातील असलेल्या पायवाटेने करावी लागते. ही वाट डोंगर दऱ्यात, चढउतार, सपाट माळरानावर जात असते. या पायवाटेने जात असतांना दोन्ही बाजूंनी डोलणारी हिरवीगार पिकं ही वाटेनं जाणाऱ्या माणसांना रानोमाळ आनंदीत करीत असतात. तसेच असलेल्या पायवाटेला सुनाट वेळेस रानातली पाखरं, व इतर पक्षी, लहान लहान दिसणाऱ्या मुंग्या ह्या येता जाता शेतकऱ्यांनी डोक्यावरून वाहून नेलेल्या पिकातील पडलेले धान्य, दाणे तोंडात धरून नेत असतांना दिसतात. कधी कधी एखादा धामण साप अचानक वाटेवरून सरपटत गवतात जातांना आढळतो. ज्या सापाची धुळीत जास्त प्रमाणात वेडीवाकडी वळण उमटलेली असतील तो साप विषारी आहे व ज्या सापाची वळणे जास्त प्रमाणात सरळ आहेत तो बिनविषारी आहे हे त्या पायवाटेवर उमटलेल्या वळणावरूनच आदिवासी बांधव ओळखून घेतात. मोठ्या गवतात, लहान मोठ्या झुडुपात मनसोक्त विहार करणारी पाखरं माणसांच्या पावलांच्या आवाजाने भुर्रकन उडून जातांना दिसत असतात.
रात्रीच्या वेळी जंगलातील हिंस्र प्राणी वाघ, बिबट्या, तसेच मुंगूस अश्याप्राण्यांचे ठसे सकाळी गुरे घेऊन जाणाऱ्या गुराख्याना वाटेवर उमटलेले दिसतात. नदीकाठा वरून गेले असता हिवाळ्यात संथपणे पाण्यात पोहणारी माशांची दोरणच दिसत असते.
दोन्ही बाजूला शेतबांधावर वनराई आणि शेत पिकाला लागूनच दाट झाडी झुडुपातून चढ उतारावरून नदीच्या काठावरून नागमोडी वळणं घेणारी पायवाट ही जनावरे व माणसांच्या नेहमी लक्षात राहत असते. लांबच्या पायी प्रवासात चालून दमलेला वाटसरू बाजूला असलेल्या एखाद्या विस्तीर्ण मोठ्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसत असे. त्या वेळी माळवाटेला लागूनच असलेल्या पिकांपैकी तूर, चवळीच्या शेंगा, हरभरा कुणाच्या शेतात दिसले की, लगेच वाटसरू आवडीने तोडून खात असे किंवा एखादा ओळखीचा माणूस भेटला तर शेतातील गावरान हिरव्या मिरच्या, भेंडी, गवारीच्या शेंगा, वाळका हे सर्व वानोळा म्हणून देत असे. तसेच रानवाटा जरी लक्षात राहत असली तरी अनेक ठिकाणी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आपुलकीने विचारावे लागत असते की ही वाट कुठे जाते हे विचारावे लागते.
त्यावेळी आदिवासी या डोंगराळ भागात वाहतुकीचे साधन म्हणजे फक्त खेडोपाड्यात बैलगाडी होती तिही ठराविक लोकांकडे असे.डोंगर उतारावर, माळरानावर येतांना याच वाटेला अनेकांची पावले उमटलेली दिसतात. गावातील कोणतेही कार्यक्रम हे शक्यतो संध्याकाळी होत असतात.तसेच आजारी व्यक्ती दवाखान्यात, विद्यार्थी शिक्षणासाठी, बाहेरगावी , बाजारात जाण्यासाठी याच माळरानातील पायवाटेने पायपीट करावी लागते.
आता खेडोपाड्यात डांबरी रस्ते झाल्याने प्रत्येकाजवळ दुचाकी, चारचाकी तसेच ट्रॅक्टर ही साधने आल्याने शेतीची कामे ही सोपी झाल्यामुळे पायपीट कमी झाल्याचे आपणांस दिसत आहे.आदिवासी बांधव रोजगारासाठी, नोकरीच्या शोधात शहराकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित होत असल्याने रानातील या पायवाटांच फारसा संबंध येत नाही. त्यामुळे या पायवाटा आता हळूहळू नामशेष होत आहेत.

Discussion about this post