परभणी/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे शनिवारी (दि.21) दुपारी परभणी दौर्यावर येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अॅड.विजय गव्हाणे यांनी दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या अवमान प्रकरणासह सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलिसांच्या मारहाणीतील मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते पवार हे शनिवारी परभणीत येणार आहेत. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टरने दुपारी 12.30 वाजता आगमन होणार असून तेथून ते लगेचच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटूंबियांच्या सांत्वनाकरीता मोंढ्यातील निवासस्थानी रवाना होणार आहेत. तेथून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करणार असून आंबेडकरी चळवळीतील नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर कारवाईच्या मागणीसाठी सुरु केलेल्या आंदोलनास भेट देणार आहेत.
रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते विजय वाकोडे यांच्या राहुल नगरातील निवासस्थानी तेथून ते दुपारी 1.30 वाजता जााणार असून वाकोडे कुटूंबियांचे सांत्वन करणार आहेत. नंतर खासदार फौजिया खान यांच्या निवासस्थानी दुपारी पावणे दोन वाजता पोहोचतील. त्या ठिकाणी पत्रकार परिषद होणार असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीनंतर ते दुपारी 3.10 वाजता हेलिकॉप्टरद्वारे पुण्याला प्रस्थान करणार आहेत.
दरम्यान, ज्येष्ठ नेते पवार यांच्या या दौर्र्यत शहरासह जिल्ह्यातील विविध आघाड्यांच्या पदाधिकार्यांसह आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात दुपारी 1 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहनही अॅड. गव्हाणे यांनी केले आहे.
Discussion about this post