.किनवट वार्ताहर दिनांक २७ शहर व परिसरात दुपारी २ वाजे दरम्यान पावसाच्या सरी कोसळल्या यामुळे कापुस या पिकाची काढणी चालु असल्याने शेतक-यांची धावपळ उडाली तर व्यापा-यांचा कापुस देखिल उघड्यावर ठेवलेला असल्याने त्यांची देखिल धावपळ झाली. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पेरणी झालेल्या हरभरा या पिकाचे नुकसान होत आहे.
तयार झालेले वातावरण हे हरभरा पिकासाठी पोषक नसल्याने शेतक-यांची चिंता वाढली आहे. परंतु शहरात मागील ७ वर्षापासुन निर्माणाधीण असलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ (अ) च्या अर्धवट कामामुळे ठीकठीकाणी खड्डे व त्यातुन शहरात सर्वत्र उडत असलेली धुळ यामुळे नागरीक प्रचंड त्रस्त आहेत. झालेल्या पावसाच्या सरीमुळे काहीअंशी धुळीतुन सुटका मिळाल्याने नागरीकांनी आनंद व्यक्त केला आहे.
शहरात सर्वत्र उडत असलेल्या या धुळीमुळे नागरीकांना खोकला, पडसा, सर्दी तसेच श्वसनाशी निगडीत आजार होत आहेत. यावर वारंवार विनंती करुन हि संबधित समस्या सोडवण्या करिता कोणत्याही लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी अथवा संबधित यंत्रणेतील प्रमुख व्यक्ती तथा कंत्राटदाराने पुढाकार घेतला नसल्याने नागरीकांकडुन प्रचंड रोष व्यक्त केल्या जात आहे. तर समाजमाध्यमावर ओरड करतांना नागरीकांच्या प्रतिक्रीया येत आहेत कि, लोकप्रतिनिधी,
प्रशासकीय अधिका-यांनी आपल्या लाखो रुपयांच्या चारचाकी वाहनातुन प्रवास करण्या एवजी सर्वसामान्य नागरीकां प्रमाणे दुचाकीवर प्रवास करावा तेव्हाच यांना नागरीकांना भेडसावत असलेल्या समस्याची जाणिव होईल.
परंतु आज शहरात दुपारी २ वाजेच्या सुमारात शहरासह परिसरात पावसाच्या सरी कोसळल्यामुळे रस्त्यावरील धुळीतुन काही अंशी का असे ना सुटका मिळाली यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे.
Discussion about this post