कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी किशोर जासूद
कोल्हापूर:- महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक समृद्ध वारसा असलेल्या जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये दोन दिवशीय क्रीडा महोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला.
प्रशालेचे प्राचार्य डॉ गजानन खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख अतिथी आदर्श माजी क्रीडा शिक्षक व लोकनियुक्त सरपंच बी. सी. कदम, उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री बी.पी.माळवे यांच्या सहित प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी उपस्थित होते. क्रीडा स्पर्धेसाठी शपथ यावेळी घेण्यात आली. क्रीडा विभाग प्रमुख श्री बी.पी.माळवे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. प्रारंभी
आदर्श माजी क्रीडा शिक्षक बी. सी. कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व मैदानाचे पूजन करून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.

उपस्थितांशी संवाद साधताना आपल्या मनोगतात मेन राजाराम प्रशालेचे अभिनंदन करताना बी. सी. कदम म्हणाले प्रशालेने शैक्षणिक क्षेत्राबरोबर सांस्कृतिक व क्रीडा परंपरा आजतागायत जोपासलेली आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. खेळाशिवाय शिक्षणाला पूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही. बौद्धिक व शारीरिक विकासाच्या समवन्यातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा समग्र विकास होतो. संयम, संघभावना, नेतृत्व विकास कठोर श्रम, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आदी गुण वाढीस लागण्यास शालेय क्रीडा स्पर्धेतून खूप उपयोग होतो. युवा पिढी कार्यक्षम ठेवण्यासाठी खेळ व व्यायाम याला अनन्यसाधारण जीवनामध्ये महत्त्व आहे. जागतिक स्तरावरील खेळाचे महत्व अधोरेखित करताना बी. सी. कदम यांनी ऑलम्पिक क्रिडा स्पर्धा, शासन स्तरावर खेळाडूना आरक्षण याविषयी मार्गदर्शन केले. खेळातून प्राप्त होणारी खिलाडू वृत्ती विद्यार्थ्यांनी आयुष्यभर जीवनात जोपासण्याचे आवाहन यावेळी कदम यांनी केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. खाडे म्हणाले, आरोग्यं धनसंपदा याचे महत्त्व जाणून व्यायाम व खेळ यांना मानवी जीवनात खूप अनमोल असे महत्त्व आहे. शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना भविष्यात अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात मेहनतीनेच कर्तृत्व सिद्ध करता येते. श्री बी.पी.माळवे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर प्रा. सुषमा पाटील यांनी आभार मानले.
Discussion about this post