प्रतिनिधी : राजेंद्र टोपले
आपला देश हा कृषीप्रधान देश आहे.भारतातील ८०% लोक शेती करतात .म्हणून शेतकऱ्यांला देशाचा कणा म्हणून ओळखले जाते. प्रत्यक्ष जमीन कसणारा म्हणजे शेतकरी होय. शेतात येणाऱ्या पिकांच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांची उपजीविका चालते.म्हणूनच ग्रामव्यवस्था व कृषि समाजरचनेचा मूलभूत घटक आहे.
रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो. शेतकरी शेतात राबतो. म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालत असतात. भारत देशाची अर्थव्यवस्था ही देखील शेतीशी निगडित आहे. या शेतीवर उद्योग धंदे, पशुधन आणि मानवाचे सर्व जीवन अवलंबून आहे. शेती थांबल्यास सर्व जीवन उदवस्त होण्याशिवाय पर्याय नसतो. कारण अन्नधान्य, भाजीपाला या सारखे जीवनातील आवश्यक बाबींचा निर्माता हा फक्त शेतकरीच आहे.ऊन, पाऊस, थंडी अशा अनेक संकटांचा कसलाही विचार न करता न थकता बाराही महिने शेतीचाच विचार करणारा, शेतीत राबणारा व्यक्ती म्हणजे या जगाचा पोशिंदा म्हणजे माझा शेतकरी होय.
भारतात जास्तीत जास्त लोक ग्रामीण भागात शेती करतात. आपल्या भारतात पूर्वीपासून सखोल शेती केली जाते. म्हणून भारताला कृषीप्रधान देश म्हटले जाते. मान्सूनवर आधारित शेती ही एक नैसर्गिक जीवन पद्धती आहे.शेती करत असताना शेतकऱ्यांना बेमोसमी, अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी घेतलेले कर्ज अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतो. हवामानात अचानक होणाऱ्या या बदलांमुळे पिकांचेमोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करत असतो. त्याची लहान मुलांप्रमाणे काळजी घेतो. पण त्याच्या या कष्टाला दरवेळेस फळ मिळतेच असे नाही. कारण शेतकरी हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्यामुळे शाश्वत कमाईचा अंदाज बांधणे कठीण जाते.
शेतीप्रमाणेच पशुधन हे खूप महत्त्वाचे आहे. गाय, बैल,म्हैस, रेडा, शेळ्या, कोंबड्या, साप, बेडूक, फुलपाखरे, मधमाश्या, गांडूळ असे अनेक प्राणी शेतकऱ्यांचे मित्र म्हणून काम करतात. पिकांची काढणी झाल्यावर शेतात पडलेले दाणे मोठ्या आनंदाने पक्षी टिपत असतात. निसर्गातील कीड नियंत्रण आणि सरपटणारे प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करत असतात.
या कृषीप्रधान देशात शेती व शेतकऱ्यांला अर्थात जगाच्या पोशिंद्याला सन्मानाचा दर्जा देण्यात यावा.हीच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी. कारण शेतकऱ्यांसाठी त्यांची शेतीच सर्व काही असते. त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील इतर उद्योग करणारे लोक हे कळत नकळत याच शेतकऱ्यांवर अवलंबून असतात. म्हणूनच म्हणतात उभ्या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी आहे.
Discussion about this post