
ISRO SpaDex Launching: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजे ‘इस्रो’ने (ISRO) एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.‘इस्रो’ने काल (ता.३०) रात्री दहा वाजता श्रीहरीकोटा येथून स्पॅडेक्स (Spadex Mission) म्हणजेच अंतराळ डॉकिंग प्रयोग मोहीम प्रक्षेपित (Launch) केली. पीएसएलव्ही सी-६० रॉकेटच्या साहाय्याने पृथ्वीपासून ४७० किलोमीटरवर अंतराळात दोन स्पेसक्राफ्ट जोडली जाणार आहेत.
चांद्रयान-४ सारख्या मोहिमेत फायदेशीर ठरणार (ISRO SpaDex Launching)

आता ७ जानेवारी २०२५ रोजी या मोहिमेत बुलेटच्या वेगापेक्षा दहापट वेगाने अंतराळात जाणारी ही दोन अंतराळयाने एकमेकांशी जोडली जातील.ही मोहीम यशस्वी झाल्यास रशिया,अमेरिका आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल. या मोहिमेच्या यशावर भारताच्या चांद्रयान-४ मिशन अवलंबून आहे. ज्यामध्ये चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. चांद्रयान-४ मिशन २०२८ मध्ये लाँच केले जाऊ शकते.

‘पीएसएलव्ही सी-६०’ या प्रक्षेपकाच्या मदतीने या दोन उपग्रहांसह अन्य काही उपग्रह सोमवारी (ता.३०) रात्री १० वाजता झेपावले. त्यानंतर १५ मिनिटांनी ते भूपृष्ठापासून ४७५ किलोमीटर उंचीवर आपल्या नियोजित कक्षेत स्थिरावले. याबाबत माहिती देताना मोहिमेचे संचालक एम.जयकुमार म्हणाले की,‘ स्पॅडेक्स’ मध्ये वापरले जाणारे दोन्ही उपग्रह एकमेकांच्या मागे असलेल्या आपल्या नियोजित कक्षेत पोहोचले आहेत.येत्या काही दिवसांत त्यांच्यातील अंतर कमी होईल.त्यांच्यातील अंतर २० किलोमीटरवर आल्यानंतर त्यांच्या जोडणीची प्रक्रिया सुरू केली जाईल. एखाद्या आठवड्यात ही प्रक्रिया पार पडण्याची अपेक्षा असून ७ जानेवारीची तारीख गृहित धरण्यात आली आहे.

‘इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार,स्पेसक्राफ्ट ए किंवा ‘चेसर’ आणि स्पेसक्राफ्ट बी किंवा ‘टार्गेट’ या उपग्रहांवर हा प्रयोग केला जाणार आहे.जमिनीपासून ४७० किलोमीटर उंचीवरून प्रवास करताना हे दोन्ही उपग्रह एकमेकांना जोडले जाणार आहेत. भविष्यातील चांद्रयान मोहीम, तेथील नमुने पृथ्वीवर आणणे, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची उभारणी, मानवी अंतराळ मोहीम यासाठी हे तंत्रज्ञान अत्यावश्यक मानले जाते. हा प्रयोग यशस्वी झाल्यास हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल.
Discussion about this post