प्रतिनिधी:- भरत पुंजारा
डहाणू, 31 डिसेंबर: महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी डहाणूतील ग्राममंगल ऐॆना शाळेला भेट देऊन शाळेतील शिक्षणपद्धतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा त्यांनी अभ्यास केला. शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा करण्यासाठी मंत्री भुसे यांनी शिक्षण तज्ञ, शिक्षक आणि संस्थाचालकांशी संवाद साधला.
ग्रामशिक्षण समित्यांना अधिक सक्षम करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना राबवण्याची ग्वाही देत शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान पालघर जिल्ह्यातील उर्वरित पात्र शिक्षक पेसा भरतीबाबत मंत्री भुसे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रकाश निकम, समाजकल्याण सभापती सौ. मनिषा निमकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. वैदेही वाढाण, समाजसेवक सचिन ठेमका, अक्षय सांबर, सुदाम गांगडे, रोहित मौळे, चेतन घाटाळ आणि गुरुनाथ सर उपस्थित होते.
मंत्री भुसे यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच शिक्षकांच्या नियुक्तीसाठी येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. त्यांच्या या भेटीमुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Discussion about this post