
उदगीर / कमलाकर मुळे :-
उदगीर तालुक्यातील हाळी येथे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जन्मोत्सवा निमित्त ‘सावित्री उत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. त्यातून महापुरूषांचे जीवनकार्य सांगण्यात आले. सलग तीन वर्षांपासून हा उपक्रम येथील तरूणांकडून राबवला जात असल्याने ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.
येथील अहिल्यादेवी होळकर चौकात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच माया गायकवाड ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन अशोकराव माने, माजी सरपंच माधवराव माने, युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस रमण माने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वसंतराव माने, पोलिस पाटील बालाजी गोडे, ग्रामपंचायत सदस्य माधव धनुरे, गौतम सोनकांबळे आदी होते. यावेळी चिमुकल्या मुलींनी महापुरुषांच्या गीतावर नृत्य सादर केले.तसेच सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य, मुलींचे शिक्षण, ग्रामीण भागातील मुलींना खेळात असणाऱ्या संधी आधी विषयावर भाषणे करून समाज जागृती केली. सूत्रसंचालन निलेश कांबळे व शिल्पा गायकवाड यांनी केले. हा उपक्रम मागील तीन वर्षांपासून ज्ञानेश्वर गायकवाड, गणेश गायकवाड व शिल्पा गायकवाड हे तरूण स्वखर्चाने करतात. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. सहभागी बालकलाकारांना अण्णाराव सोमवंशी यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले..
Discussion about this post