कुरखेडा तालुक्यातील घरकुल बांधकामासाठी रेती वितरणाचा कालावधी वाढवला
कुरखेडा: तालुक्यात घरकुल बांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या रेतीचे वितरण तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले होते. मात्र, या वितरणासाठी सुरुवातीला केवळ तीन दिवसांचा कालावधी ठरविण्यात आला होता. यामुळे अनेक लाभार्थ्यांना वेळेत रेती मिळविणे अवघड झाले होते.दरम्यान, या संदर्भात आलेल्या तक्रारींवरून आरमोरी विधानसभेचे आमदार रामदास मसराम यांनी तत्काळ लक्ष घातले. त्यांनी तहसीलदार कार्यालयाशी थेट संवाद साधत रेती वितरणाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली.
आमदारांच्या हस्तक्षेपामुळे आता रेती वितरणाचा कालावधी तीन दिवसांवरून सर्व घरकुलधारकांना वितरण होण्यापर्यंत वाढविण्यात आला आहे.रेती वितरणाचा कालावधी वाढल्यामुळे घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाढीव कालावधीत जास्तीत जास्त गरजूंना रेती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनेकांनी आमदार मसराम यांच्या तातडीच्या हस्तक्षेपाचे कौतुक केले आहे.याआधी कमी कालावधीत वितरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती, आणि लाभार्थ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता व्यवस्थापनासाठी अधिक चांगली योजना आखण्यात येणार आहे. तहसीलदारांनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शवत लाभार्थ्यांसाठी पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.कुरखेडा तालुक्यातील या सकारात्मक घडामोडीमुळे इतर गावांमधील गरजूंनाही याचा लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
✍🏻प्रतिनिधी: प्रविण डी कोवाची (9637165828)
Discussion about this post