धाराशिव: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी या पदासाठी धनंजय मुंडे यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत होते. मात्र, त्यांना झालेल्या विरोधामुळे सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.धाराशिव जिल्ह्यात महायुतीचे दोन आमदार निवडून आले आहेत
तानाजी सावंत (शिवसेना) आणि राणा जगजितसिंह पाटील (भाजप). मागील अडीच वर्षांपासून तानाजी सावंत पालकमंत्री पद भूषवत होते. मात्र, या वेळी त्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, राणा पाटील यांनी सरनाईक यांचे स्वागत करत फेसबुकवर अभिनंदनपर संदेश पोस्ट केला आहे. पाटील म्हणतात, “राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांची धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन! पुढील कार्यासाठी शुभेच्छा.”महायुती सरकारच्या मागील अडीच वर्षांत धाराशिव जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले आहेत.
काही प्रकल्प अद्याप प्रस्तावित असून, त्यांची पूर्तता करण्यासाठी सरनाईक यांचे सहकार्य आणि पाठपुरावा अपेक्षित असल्याचा विश्वासही राणा पाटील यांनी व्यक्त केला आहे.तानाजी सावंत यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेत असंतोषाचे वारे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर, प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या विकास प्रकल्पांना चालना मिळेल, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
Discussion about this post